जळगाव : सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांसाठी शनिवार आणि रविवारी परीक्षा होणार आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागात वर्ग ‘ड’ची पदे भरली जाणार असून, यासाठी ४२ केंद्रांवर जिल्ह्यात या परीक्षेचे नियोजन करण्यात आली आहे. यासाठी ४२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी एक कंट्रोलरूमही स्थापन करण्यात आला आहे.
राज्यभरात विविध पदांसाठी ही भरती होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील वर्ग ‘ड’च्या विविध ६० पेक्षा अधिक पदांचा यात समावेश असून, १४ हजारांवर अधिक परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना हॉलतिकिटावर दिलेल्या केंद्रांनुसार सकाळी दहा वाजताच हजर राहायचे आहे. या ठिकाणी १२ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
परीक्षा कालवधीत होणार चित्रीकरण
प्रश्नपत्रिका या पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार असून सकाळी केंद्रावर त्या पोहोचणार आहे. परीक्षा पारदर्शकपणे व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार यात घडू नये म्हणून संपूर्ण परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर हा डाटा सांभाळून ठेवला जाणार असून नंतर काही घडल्यास पुरावा म्हणून वापरता येणार आहे.
परीक्षार्थींचा कोट
हॉल तिकीट प्राप्त झाले असून त्यावर चुका नाही. ते व्यवस्थित आहे. अनेक दिवसांपासूनची रोजगार भरती बंद होती. ती सुरू झाल्याने उमेदवारांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे. - बापूसाहेब पाटील, परीक्षार्थी
जिल्ह्यात विविध केंद्रांत ही परीक्षा असून आमच्या हॉल तिकीटवर याबाबत स्पष्टता आहे. नियमानुसार केंद्रांवर जाऊन परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. - उदय पाठक, परीक्षार्थी
१) जिल्ह्यातील एकूण केंद्रे - ४२
परीक्षार्थी -१४ हजार
सकाळी दहापासून केंद्रावर हजर रहा
सकाळी दहा वाजताच परीक्षार्थींना केंद्रावर हजर व्हावे लागणार आहे. तर १२ वाजता परीक्षा सुरू होणार असून, २ वाजेपर्यंत ती चालणार आहे. पूर्ण परीक्षेचे नियोजन हे एका कंपनीकडे असून जिल्हा शल्यचिकित्सक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अद्यापपर्यंत हॉल तिकिटांच्या चुकांबाबत कसलीही तक्रार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
मदतीसाठी हे करा ?
हॉल तिकीटवर चुका आढळून आल्यास किंवा परीक्षेसंदर्भातील अडचणीं सोडविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात एक कंट्रोल रूम उघडण्यात आला आहे. २२२६६११ या क्रमांकावर संपर्क करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. यात दिव्यांग विद्यर्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यात ६९ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे.