जळगाव : कर्ज देण्याच्या नावाखली जिल्ह्यातील १४ तरुणांची २ लाख ८१ हजार ४५८ रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील नोएडा येथील शुभजनलक्ष्मी या कंपनीचा व्यवस्थापक दीपक चव्हाण, मानसी शर्मा व अनिल या तिघांविरुध्द शुक्रवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खंडेराव बापू महाले (वय २९ रा. हरिविठ्ठल नगर) या एजंटने फिर्याद दिली आहे.
खंडेराव महाले या तरुणाची मार्च महिन्यात शुभ जनलक्ष्मी नोएडा कंपनीत जिल्ह्याचे एजंट म्हणून नियुक्ती झाली. ग्राहक गोळा करुन लोन विषयी माहिती देवून जीएसटी व प्रोसेसिंग फी ऑनलाईन भरण्याची माहिती देवून महाले जिल्ह्यात विविध ठिकाणचे ग्राहक गोळा करत होता. अशाप्रकारे महाले यांनी कर्ज देण्याच्या नावाखाली ७ ते २१ एप्रिल रामेश्वर कॉलनी, असोदा रोड, सिंधी कॉलनी, समतानगर, रामनगर, ममुराबाद, धरणगाव तालुक्यातील पथराड याठिकाणचे १४ ग्राहक जमविले. त्यांनी शुभ जनलक्ष्मी कंपनीच्या बँक खात्यावर एकूण २ लाख ८१ हजार ४५८ रुपये जमा केले. ७ महिने उलटूनही कुठलाही प्रतिसाद तसेच भरलेली रक्कम परत मिळत नसल्याने महाले यांच्यासह ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यानुसार याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
यांची झाली फसवणूक
महारु रघुनाथ गावंडे (रा.रामनगर), मयुर श्रावण बारी (रा. रथचौक),ज्योती कुमोत भंगाळे (सिंधी कॉलनी),समशेद मोहम्मद शेख (समतानगर),गजानन लहू कोळी (रा.खेडी, जळगाव),कैलास त्र्यंबक पालवे, विनोद बळवंत रोकडे ( रा.चिंचोली ता.जळगाव), संजय गडबड जाधव (रा. पथराड ता.धरणगाव), रामकृष्ण बारकु लंके (रा. पथराड ता. धरणगाव),विशाल विनोद कोळी (रा.आसोदा रोड,जळगाव),अमर विलास पाटील (रा.ममुराबाद, जळगाव) व रंजना पंढरीनाथ बाविस्कर (आसोदा रोड, जळगाव),कल्पना मोरे (रा. रामेश्वर कॉलनी) व भूषण वाणी (रा. रामेश्वर कॉलनी )आदी.