निंभोरा बुद्रुक, ता.रावेर : येथील स्टेशन परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेतील केळी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ११५ शेतकरी विमा रक्कम मंजूर होऊन ४५ दिवस लोटले तरी त्यांच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. या कारणामुळे हे शेतकरी महिनाभरापासून चकरा मारून त्रस्त झाले आहेत; मात्र व्यवस्थापक किंवा कर्मचारी अथवा विमा कंपनीचा कोणीही जबाबदार अधिकारी यासाठी ठोस कारण देत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
विम्याच्या रकमेसाठी बँकेत या शेतकऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचे अनेकदा तू तू मै मै होत आहे. आधीच या बँकेतील कर्मचारी वर्ग इतरत्र बदलून गेल्यानंतर त्या जागेवर पूर्ण क्षमतेने कर्मचारी नसल्याने ग्राहकांना मोठा त्रास होत आहे.त्यातच विमा रकमेच्या विलंबामुळे समाधान होत नसल्याने बँकेचे ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. या संबंधी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने बँकेत सहा.व्यवस्थापक नीलेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात ७ डिसेंबरपर्यंत विमा रक्कम खात्यात न पडल्यास शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, गिरीश नेहेते, खिर्डीचे गिरीश ढाके, डॉ. मुरलीधर पाटील, वाघाडीचे देवराम चौधरी, कांडवेलचे शिवाजी पाटील आदी तसेच शेतकरी उपस्थित होते.
स्टेट बँक व्यवस्थापनाने या शाखेकडे लक्ष देऊन चौकशीची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.