पोलिसांनी केलेल्या तपासात मालमत्ता खरेदी-विक्रीतही मोठा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून सुनील झंवर व इतरांनी ज्या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत, त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्याशिवाय ज्या मालमत्ता अधिकृत वेबसाईटवरील निविदांच्या माध्यमातून खरेदी व विक्री झालेल्या आहेत, त्यादेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या सर्व मालमत्तांच्या दुय्यम निबंधक कार्यालयातही नोंदी तपासल्या जाणार आहेत. जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, शेंदुर्णी, पुणे, हवेली, नागपूर, फलटण (जि. सातारा), लातूर, सांगवी (जि. पुणे), देऊळगाव माही (जि. बुलडाणा), बारामती, शिरुर (जि. पुणे) कुसुंबा (ता. जळगाव,) भुसावळ, टोणगाव, भडगाव यासह इतर ठिकाणच्या मालमत्ता खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
...........
नोटिशीचा एकच नमुना, खाडाखोड
मालमत्ता विक्रीबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. ज्यांनी निविदा भरल्या होत्या, त्यांना नोटिशी बजावण्यात आलेल्या होत्या. या सर्वांच्या नोटिशींचा नमुना एकसारखाच आहे. त्यातही जावक क्रमांकामध्ये खाडाखोड, अवसायकाच्या सह्यांमध्ये तफावत आहे. ज्यांनी निविदा भरलेल्या होत्या, त्यातील बहुतांश जणांनी फिक्स डिपॉझिट ठेवली होती व ३० टक्के रक्कम डीडी व ७० टक्के रक्कम संस्थेत ठेवलेल्या फिक्स डिपॉझिटमधून घेण्याबाबत मालमत्ता खरेदीदारांनी कळविले होते; परंतु संस्थेने त्यांची ही मागणी फेटाळली होती. याचाच अर्थ ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमेबाबत कुठलीही शाश्वती देण्यात येत नव्हती. अशा प्रकारे निविदा रद्द करून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून त्या जवळच्या लोकांना कवडीमोल भावात विक्री करण्याचा धंदाच संस्थेने केल्याचे उघड झाले आहे.