सिपोरा बाजारजवळ घडली घटना ; नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
भोकरदन : चारचाकी वाहनातून घराकडे जात असताना घडलेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सिपोरा बाजार ते टाकळी या रस्त्यावर घडली. अरुण अशोक गिरणारे (वय ३५, रा. कोदोली ता. भोकरदन) असे मृत तरुणाचे नाव आहेत.
भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील अरुण गिरणारे हा चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करतो. रविवारी एका विवाहाचे वºहाडी सोडून तो रात्री कोदोली या गावाकडे तवेरा वाहनाने जात होता. सिपोरा बाजारजवळ आल्यावर नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. त्यात अरुणचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी कोदोली येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.