पारध : तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पारध ते वालसावंगी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याने, पारध येथील ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. याला पंधरा दिवस उलटूनही संबंधित विभागाने दखल न घेतल्याने हे काम जैसे थे आहे. परिणामी, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पारध ते वालसावंगी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. केवळ सात किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत आहे, शिवाय वाहनांचे होणारे नुकसान आणि चालक, प्रवाशांना जडणारे हाडांचे आजार वेगळेच आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी लावून धरली होती. ग्रामस्थांच्या रेट्यानंतर बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती, परंतु होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर, ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले होते. जोपर्यंत दर्जेदार काम होणार नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची चौकशी करून तत्काळ हे काम सुरु करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता, हे काम बंदच आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तर दिली.
पारध -वालसावंगी रस्त्याचे काम काही ठिकाणी निकृष्ट होत आहे. या कामाची पाहाणी करून आम्ही तत्काळ दर्जेदार काम सुरू करू.
डी.एन. कोल्हे, सहायक अभियंता, सा.बां. विभाग
लोकप्रतिनिधींनी पारध परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी भरघोस निधी खेचून आणलेला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित गुत्तेदार हे स्वतःचे खिसे गरम करून घेत आहे आणि लोकप्रतिनिधींना बदनाम करतात. त्यामुळे पारध आणि परिसरातील रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
मनिष श्रीवास्तव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख
फोटो ओळी
पारध - वालसावंगी रस्ताचे काम अशा प्रकारे थातूरमातूर करण्यात आले.