दरम्यान, जालन्यातील अनेक परिवार हे या कोरोनाच्या चपेटमध्ये आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडून एकाच मोठ्या रूममध्ये सर्व कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना ठेवले जात असल्याने मोठा आधार मिळत असून, त्यामुळे किमान एकमेकांना धीर देण्यास मदत होत आहे. हा आजार ‘राजा हो या रंक’ कोणालाही होत असल्याने प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेत आहे; परंतु हेही दिवस जाऊन पुन्हा नव्या दमाने आपण सर्वजण चांगले जीवन जगून पुढील वर्षी नेहमीच्या उत्साहाने धुळवड, अर्थात होळीचे रंग एकमेकांना लावून रंगात न्हाऊन निघू, यात शंका घेण्याचे कारण नाही.
चौकट
‘अच्छे दिन फिर आएंगे’
आमचे सरकार ज्या टॅगलाइनवर निवडून आले आहे, ती टॅगलाइन म्हणजे ‘सब का साथ, सब का विकास’ आणि ‘अच्छे दिन’ हीच होती. आज कोरोना संकटाने संपूर्ण देश आणि आपला महाराष्ट्र हैराण आहे. त्यासाठी केंद्राकडून शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत देऊन आम्ही हातभार लावत आहोत; परंतु जनतेने कोरोनाची भीती बाळगण्याऐवजी त्याची काळजी घेऊन सूचनांचे पालन केल्यास पुन्हा पूर्वीसारखेच ‘अच्छे दिन’ येण्यास उशीर लागणार नसून, शास्त्रज्ञांच्या मदतीने या आजारावरही हमखास खात्रीशीर औषध येईल. सध्याची लस ही देखील प्रभावी ठरत आहे.
केंद्रीय मंत्री, रावसाहेब दानवे.
-----------------------
‘हारी बाजी को जितना...’
‘हारी बाजी को जितना हमे...आता है...दोस्तों...’असेच सध्याची कोरोनाची गंभीर स्थिती पाहून म्हणावे लागेल. शासन आणि आपण सर्वजण या गंभीर विषाणूजन्य आजाराने त्रस्त झालो आहोत; परंतु मानवाने अनेक संकटांवर मात केली आहे. कोरोनावरही मात करू. आज जी आपली सर्वस्व हरवल्यासारखी जी अवस्था झाली आहे, त्यावर आपण येत्या काळात मात करू. ‘हारी बाजी को जितना हमे आता हैं...दोस्तो’ हे गाण्याचे बोल खरे ठरवू हा विश्वास आहे.
कैलास गोरंट्याल, आमदार, जालना
--------------------------
कोरोनाच्या शिकारीसाठी सज्ज
आम्ही शिवसैनिक आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक असल्याने आम्ही नेहमीच राजकीय संकट असो की, नैसर्गिक यावर मोठ्या हिमतीने मात केली आहे. आमच्या पक्षाचे बोधचिन्हच मुळी वाघाचे आहे, म्हणजेच वाघ हा कोणालाही न भिणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोरोनासारख्या मृतप्राय विषाणूची शिकार देशातील शास्त्रज्ञ आणि सूचनांचे पालन करून करू, असा विश्वास आणि आमचा निश्चय आहे. आपण स्वत: सर्वांच्या आशीर्वादाने या आजारावर मात करून दोन हात केले आहेत. त्यामुळे हिंमत ठेवूनच कोरोनाची शिकार करता येते.
अर्जुन खोतकर, माजी मंत्री, तथा सभापती बाजार समिती.
--------------------------------
‘आरोग्यम् धनसंपदा’ लवकरच...
आरोग्याचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. संस्कृतमध्ये एक म्हण आहे. ‘शरीर रक्षील तोच धर्म...’ म्हणजे जो आरोग्याकडे लक्ष देऊन ते चांगले राखण्यासाठी प्रयत्न करील तोच सुखी, असे यातून विशद होते. योगायोगाने राज्याचे आरोग्यमंत्रीपद हे जालन्याचे भूमिपुत्र अससेल्या राजेश टोपेंकडे चालून आले आणि त्यांनी त्याचे सोने केले. दिवस-रात्र एक करून त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांच्या मदतीने अटकेपार झेंडे लावले. त्यांनी स्वत:देखील या विषाणूचा हल्ला लीलया परतवला. त्यामुळे भविष्यात या कोरोनावर मात करणे शक्य होणार असल्याचा त्यांचा दुर्दम्य विश्वास आहे.
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
---------------------
लव्हाळे होऊन लढा शक्य....
कोरोनाचे संकट किती गंभीर आहे, हे आपण जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून जवळून पाहिले आहे. त्याची दाहकता जाणून आहोत. म्हणूच गेल्या वर्षभरात आपण सर्व ती कामे ही अत्यंत बारकाईने लक्ष देऊन सर्वांच्या मार्गदर्शनाने पूर्ण केली. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी सर्व यंत्रणांची साथ तेवढीच महत्त्वाची आणि भक्कम मिळाल्याने बराच लाभ झाला. कोरोनाची लाट म्हणजे ही समुद्रातील एखाद्या महाकाय लाटेप्रमाणे आणि नदीला आलेल्या पुराप्रमाणे आहे. त्यामुळे यातही मानवाला टिकून राहायचे झाल्यास पाण्यातील लव्हाळे या गवताप्रमाणे राहिले पाहिजे. कितीही पूर आला तरी नंतर हे लव्हाळेरूपी तृण मोठ्या डौलाने उभे राहते. त्या पद्धतीने कोरोनाशी लढा देणे गरजेचे आहे.
--------------------------