जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मंगळवारी आणि बुधवारी सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. घनसावंगी तालुक्यातही जोरदार पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात ८८ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्याने गुरुवारी सकाळी या प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. गेल्या महिनाभरात या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची ही तिसरी वेळ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे दरवाजे उघडल्याने दुधना नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जालन्यात भिजपाऊस
जालना शहर व परिसरात बुधवार आणि गुरुवार असे दोन्ही दिवस भिजपाऊस पडला. यामुळे दुधना, कुंडलिका नद्यांना पूर आला आहे. जालना तालुक्यातील गोलापांगरी येथून वाहणारी दुधना नदी दुथडी भरून वाहत होती. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ही ६०३ मि.मी. एवढी असून, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची टक्केवारी ही ९६ टक्के आहे.