परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या- उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे.
फोटो क्रमांक - १२ जेएनपीएच ०१
शेतकरी समाधानी; रबीच्या पिकांना होणार फायदा
परतूर (जि. जालना): तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याला मंगळवारी दुपारी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा रबी पिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
यंदा जूनच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने नदी-नाले तुडुंब वाहिले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी तालुक्यातील सर्वांत मोठा असलेला यंदा निम्न दुधना प्रकल्प १०० टक्के भरला. आता सध्या धरणात ९० टक्के जिवंत पाणीसाठा आहे.
यंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी रबीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. गहू, हरभरा व ऊस ही पिके जोमात आली आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे निम्न दुधनाच्या डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडले आहेत. डाव्या कालव्यातून १०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून ७५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या २४२.२०० दलघमी म्हणजेच ९३.४२ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. धरणात एवढा मोठा पाणीसाठा असल्याने सिंचनासह पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.
बॅक वॉटरमध्ये घट
परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे बॅक वॉटरमध्येही मोठी घट होत आहे. बॅक वॉटरवर अनेक गावांचे पाणी पुरवठा व सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. यामुळे येथील ग्रामस्थांसह शेतकरी चिंतेत आहे.