पाच हजार लोकसंख्येच्या वरूड (बु.) गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दानापूर येथील जुई प्रकल्पात विहीर खोदण्यात आली आहे. गत पंधरा वर्षापासून या विहिरीतून सार्वजनिक नळाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या शेवटी, भरपावसाळ्यात गावातील महिला, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेकांना आडातील पाणी जीव धोक्यात घालून शेंदावे लागते. अशीच परिस्थिती मागील पंधरा दिवसांपासून गावात निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सध्या मुबलक प्रमाणात पाणी आहे. धरणातील विहिरीवरून गावातील सार्वजनिक आडात पाणी सोडण्यात येते. परंतु, हे पाणी नळाला सोडले जात नाही. सार्वजनिक नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना हातातील कामे सोडून पाण्यासाठी हांडे व बादल्या घेऊन आडावर पाणी शेंदण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे आडावर एकाच वेळी पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे. एखाद्याचा तोल जाऊन किंवा धक्का जाऊन कोणी विहिरीत पडले, तर दुर्दैवी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक नळांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे.
कोट
पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी ग्रामपंचायतीकडून नळजोडणी घेतली आहे. परंतु, नळाला पाणी येत नसल्याने जीव धोक्यात घालून आडातून पाणी शेंदून आणावे लागत आहे. आडावर गर्दी होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा.
प्रकाश धनराज, ग्रामस्थ
कोट
नळाला तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा होत नसेल, या प्रकाराची चौकशी केली जाईल. बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जातील.
एस.टी. शिंदे, ग्रामसेवक वरुड (बु.)
फोटो