दाणापूर : नूतन वर्षातील भर कडाक्याच्या थंडीत भोकरदन तालुक्यातील जवळपास ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार असून, आतापासूनच गावोगाव वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेष करून दाणापूरसह कठोरा बाजार, सुरंगळी, मूर्तड, दगडवाडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सकाळ- संध्याकाळ गावातील चौका- चौकात शेकोट्या पेटून तरुणाई बैठका घेत आहे. जुने सोडा नवीनला संधी द्या, यातून गावचा विकास होईल, असे अनेक जण मतदारांना आश्वासने देऊन भुरल घालण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
दाणापूर येथे मागील १० वर्षांपासून तरुण वर्ग स्वत:चे नवीन पक्ष तयार करून जुन्या लोकांच्या विरोधात उभे राहण्याचे नियोजन करतात; परंतु ऐनवेळी गावातील जुनी मंडळी डावखेळी खेळून तरुण वर्गाच्या नाकी नऊ आणतात. आजवर दाणापुरात नव तरुण वर्गाला स्वत:चा पक्ष बनविता आलेला नसून, जुन्या लोकांचाच आधार नव तरुणांना घ्यावा लागतो. यंदाही हेच चित्र गावात दिसून येत आहे. भायडी सर्कलमधील एकमेव दाणापूर हेच मोठे गाव आहे. गावात आजवर कोणताही मोठा कार्यकर्ता व नेता उभा राहिलेला नाही. शिवाय गावातीलही जुने कार्यकर्ते नवीन चेहऱ्यांना संधी देत नाही.