११ केंद्रे : जिल्हाभरातील ३५०० जणांची ऑनलाईन नोंद
जालना : कोरोनाच्या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस दल, नगर पालिका, नगर पंचायतीतील अधिकारी, कर्मचारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना बुधवारपासून कोरोनाची लस देण्यास प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर ही लस दिली जाणार असून, आजवर ३५०० जणांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
कोरोनाच्या लढ्यात बाधितांची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्रथम देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. प्रारंभी जिल्ह्यातील १३ हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १४ हजार ५२० डोस प्राप्त झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात १३ हजार डोस प्राप्त झाले होते. आजवर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ५५९४ जणांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. यात ६४६ डॉक्टर आणि ४९४८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आता पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्या धर्तीवर संबंधितांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील पोलीस दल, नगर पालिका, नगर पंचायतीतील जवळपास ४५०० जणांना लस देण्यात येणार आहे. त्यापैकी आजवर ३५०० जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. आरोग्य विभागातील उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस व नगर पालिकेतील काेरोना योद्ध्यांनाही बुधवारपासून लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
वरुडीत ३७ जणांना दिली लस
बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील मेडिकल कॉलेजमध्ये मंगळवारी कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ३७ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. यात २१ डॉक्टर व १६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोट
कोरोना लसीकरणाच्या प्रारंभीच्या सत्रात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी आता पोलीस दल, नगर पंचायत, नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे.
डॉ. विवेक खतगावकर
जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना
(ग्राफ)
कोरोनाची स्थिती
जिल्ह्यातील संशयित १९९९०
कोरोनाबाधित १३७८३
आजवर मृत ३६७
कोरोनामुक्त १३१७३
रिकव्हरी रेट ९५.९७
मृत्युदर २.६६