परतूर : कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
परतूर : शहरातील शासकीय रुग्णालयाच्या स्लॅबसाठी चक्क मातीमिश्रित कचचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाच्या दार्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
परतूर शहरातील शासकीय रुग्णालयात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी अद्यावत ऑपरेशन थिएटर व लेबर रूम बांधण्यात येत आहे. मात्र, या कामाच्या दर्जाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले आहे. या इमारतीच्या छताचे काम सुरू आहे. या छतासाठी चक्क वाळूऐवजी मातीमिश्रित खडीची कच वापरण्यात आली आहे. स्लॅबचे काम सुरू असताना एका बाजूला थोडी वाळू टाकण्यात आली होती, तर खडीचा डस्टमिश्रित कचचा मोठा ढिगारा घालण्यात आला होता. वाळूमध्ये ही कच मिसळून छतासाठी वापरण्यात आली आहे. कच व खडीमिश्रित करण्यासाठी दोन जेसीबी सज्ज ठेवण्यात आले होते. यासाठी सिमेंटचे प्रमाणही पाळण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हे काम एक कोटी ३२ लाख रुपयांचे असल्याचे सांगण्यात आले. काम शासकीय रुग्णालयाचे असल्याने दर्जेदार होणे आवश्यक आहे. सध्या रुग्णालयात अनेक दुर्घटना घडत आहेत, असे असतानाही या कामासाठी वाळूऐवजी कच वापरल्याने हा स्लॅब किती दिवस टिकणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कामाच्या गुणवत्तेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असून, या कामाची गुण नियंत्रककडून (क्वॉलिटी कंट्रोल विभाग) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
वाळूचा तुटवडा
सध्या परतूर तालुक्यातील दुधना व गोदावरीतील वाळू पट्टे पाण्याखाली गेले आहेत. मागील वर्षभरापासून वाळूची अडचण आहे. वाळू मिळत नसल्याने अनेक बांधकाम ठप्प आहेत. यातच काही शासकीय कामे ओढ्या-नाल्यांची वाळू व खडीच्या कचमध्ये उरकण्याचा प्रयत्न होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
या कामावरील कनिष्ठ अभियंता शशिकांत पंचकल्ले म्हणाले, कच हा दुसऱ्या कामासाठी आणण्यात आला होता. या कामासाठी वाळूच वापरण्यात आली आहे.
फोटो ओळ : परतूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी वाळूऐवजी कचचे ढिगारे स्लॅब टाकण्यापूर्वी टाकण्यात आले होते.