रस्त्यावर खड्डे
जालना : तालुक्यातील साळेगाव घारे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
लसीकरण केंद्रास नगराध्यक्षांची भेट
जालना : शहरातील नूतन वसाहत प्रभाग क्रमांक २७ मध्ये नगरसेवक अरुण मगरे, रवी जगदाळे यांनी सुरू केलेल्या लसीकरण केंद्रास नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी गणेशआप्पा एलगुंदे, आनंद लोखंडे, रंजित मगरे, सागर ढक्का, अजय जाधव, योगेश माधवाले, वल्लभ कुलकर्णी, अनिस शेख आदी उपस्थित होते.
दाभाडीत हार्डवेअर मशिनरीचे दुकान फोडले
बदनापूर : तालुक्यातील दाभाडी येथे हार्डवेअर व मशिनरीचे दुकान फोडून रोख रक्कम व साहित्य असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. दाभाडी येथील कैलास रामकिसन म्हसलकर यांचे मशिनरी आणि हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास चव्हाण हे करीत आहेत.
अंबड येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
अंबड : बँक दिनानिमित्त एसबीआय बँकेच्या अंबड शाखेच्या वतीने मराठवाडा सेवानिवृत्त मंडळाचे जिल्हासंपर्क प्रमुख व्ही. एस. तिडके यांच्यासह विविध क्षेत्रातील ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुनीलराम देवा, दिनेश भल्ला, विजय सोनकोसरे, अंकुश जाधव, अश्विनी खेडकर, सुमित देशमुख, अभिषेक कुमार आदींची उपस्थिती होती.
पासोडीत दिव्यांग निराधार महिलेस मदत
जाफराबाद : प्रहार जनशक्तीच्या वतीने पासोडी येथील एका दिव्यांग तथा निराधार महिलेच्या घरासाठी टिनपत्रे व तिला साडी-चोळी देण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीमंत राऊत, तालुकाप्रमुख दत्ता भालके, शरद पंडित, सुनील पंडित, एकनाथ शिंदे, तानाजी पंडित, दगडुबा शिंदे, दिलीप देवढे, राहुल म्हस्के, योगेश पाचरणे, अरुण जंजाळ, प्रवीण शेळके आदींची उपस्थिती होती.
स्मशानभूमीची पाहणी
वालसावंगी : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच येथील बारी समाज स्मशानभूमीची पाहणी केली. येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी परिश्रम घेणाऱ्या युवकांचे कौतुक केले. याप्रसंगी राजू कोथलकर, मनीष बोडखे, गणेश पायघन, संजय कोथळकर, किशोरकुमार फुसे, हिरालाल कोथळकर हे हजर होते.
पावसाची प्रतीक्षा
परतूर : तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने नुकतीच पेरणी झालेली पिके सुकू लागली आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी केलेली लागवड कडक उन्हामुळे नष्ट होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.