अखेर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील दुनगाव दर्गा येथून मिस्त्रीकामाचे साहित्य आणण्यासाठी पाचोडला निघालेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याची घटना औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील मुरमा फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मुस्तफा लालाखाँ पठाण (३५), कडूभाऊ निवृत्ती काशीद (३१, दुनगाव) हे दोघे जागीच ठार झाले. दरम्यान, शनिवारी कारचालकाविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिस्त्रीकाम सुरू असल्याने ते सामान खरेदीसाठी पाचोडला दुचाकीवरून (एमएच-२०, एएन-२३८२) जात असताच बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या धडकेत मुस्तफा पठाण हे जागीच ठार झाले, तर कडूभाऊ काशीद गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलविण्यात येत असताना रस्त्यानेच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर दोघांवर दुनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुस्तफा लालाखाँ पठाण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, असा परिवार आहे. मुस्तफा हे घरातील प्रमुख होते. आता त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कडूभाऊ निवृत्ती काशीद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.
===Photopath===
200221\20jan_62_20022021_15.jpg
===Caption===
दुचाकीला धडक दिलेली कार