जालना : भरधाव वेगाने येणाऱ्या मिक्सर ट्रकने स्कूटीचालकास जोराची धडक दिल्याची घटना जालना-मंठा महामार्गावरील यशवंती हॉटेलजवळ गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात स्कूटीचालक शेख बशीर शेख उमर (५० रा. परतूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
परतूर येथील शेख बशीर शेख उमर हे गुरुवारी दुपारी स्कूटीने रामनगरहून परतूरकडे जात होते. जालना-मंठा रोडवरील यशवंती हॉटेलजवळ आल्यावर पाठीमागून येणाऱ्या सिमेंट कॉंक्रिट मिक्सर ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत शेख बशीर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विलास मोरे, पोउपनि रत्नदीप बिराजदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल डी.एन. गोडबोले, अविनाश मांटे, चैनसिंग नागलोत, ज्ञानोबा बिरादार, सतीश श्रीवास यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेख बशीर यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांनी दिली.