जालन्यात शिवगान स्पर्धेचे आयोजन
जालना : भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्ती गीते, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा यात समावेश राहणार असून, ९ फेब्रुवारी रोजी शहरातील आंबेडकर सभागृहात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
धावडा गावामध्ये स्वच्छता मोहीम
धावडा : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या सुंदर माझं गाव या उपक्रमास धावडा येथे प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त गावातील विविध भाग, शासकीय कार्यालये स्वच्छ केली जात आहेत. यावेळी ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, ग्रा.पं. सदस्य बेलाप्पा पिसोळे, दिलीप वाघ, रामराव पवार, सय्यद रशिद, विलास भडगे, शांतीलाल खैरे, पांडुरंग तबडे, धनंजय तबडे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद शाळेची मापारींनी केली पाहणी
जालना : तालुक्यातील जळगाव सोमनाथ येथील जिल्हा परिषद शाळेला उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना केले जाणारे ज्ञानदान, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची उपस्थिती. शाळेत राबविले जाणारे उपक्रम आदींची माहिती त्यांनी घेतली. तसेच पालक, विद्यार्थ्यांशी संवादही साधला. शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर शिक्षकांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
सावता परिषदेच्या वतीने अभिवादन
परतूर : येथील सावता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष परमेश्वर ढवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सावता परिषदेच्या कार्याची माहितीही देण्यात आली. कार्यक्रमास रानुजी हरकळ, प्रदीप राऊत, पद्माकर जईद यांच्यासह नागिरकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.