गोंदी पोलिसांची कारवाई ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील कोठी येथील नारोळा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तीर्थपुरी पोलीस चौकीतील पोलिसांनी रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास पकडले. यात सहा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोठी येथील नारोळा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता, कोठी शिवारातील नदीपात्रातून वाळू घेऊन एक ट्रॅक्टर जाताना दिसला. ट्रॅक्टरचालकाने पोलिसांना पाहताच पळ काढला. हा ट्रॅक्टर वाळूसह तीर्थपुरी चौकीत लावण्यात आला आहे. ट्रॅक्टरसह एक ब्रास वाळू असा ६ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सय्यद ईनाज सय्यद बाबा मिया याच्याविरुद्ध तीर्थपुरी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षिक गजानन कौळासे, पोलीस नाईक माळी, पोलीस शिपाई दाभाडे यांनी केली.