तीर्थपुरी : ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झालेल्या अलका अण्णासाहेब चिमणे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा गुरुवारी ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे यांच्याकडे केला आहे.
जालना जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या तीर्थपुरी ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच जाहीर झाली होती. १७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होणार असल्याची घोषणा झाल्याने नगरविकास विभागाने निवडणूक रद्द करण्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले होते; परंतु निवडणूक रद्द झाली नाही. गावाच्या विकासासाठी १६ उमेदवारांनी एकत्र येऊन अर्ज मागे घेतले; परंतु ज्योती चिमणे यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी अलका चिमणे यांचा उमेदवारी अर्ज केला. यात त्या निवडूनही आल्या; मात्र ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतींमध्ये होणार असल्याने एकमेव निवडून आलेल्या अलका चिमणे यांनी गुरुवारी ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यावेळी सरपंच शैलेंद्र पवार, शिवाजी बोबडे, तात्यासाहेब चिमणे, अंकुश बोबडे, गणेश पवार, अण्णासाहेब चिमणे, श्रीकृष्ण बोबडे, मेहरनाथ बोबडे, लक्ष्मण उढाण, श्रीराम गिरी, सतीश पवार, सुभाष चिमणे, राजेंद्र चिमणे, रवींद्र बोबडे, बाळासाहेब तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती.