परतूर (जि.जालना) : परतूर पोलिसांनी सोयाबीन चोरणाऱ्या तिघांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चार लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त करण्यात आला.
परतूर तालुक्यातील चिंचोली येथील सुदर्शन प्रभाकर कातारे यांचे परतूर शहरातील साईबाबा चौकात गोडाऊन आहे. २६ नोव्हेंबर रोजी रात्री त्या गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील ५० हजार ४०० रुपये किमतीचे २२ पोते सोयाबीन चोरून नेले होते. या प्रकरणात कातारे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित करण सखाराम पवार (वय २४), गजानन प्रभू मोरे (वय ३०, दोघे रा. आनंदवाडी) व महेश गणेश कातारे (रा. चिंचोली) या तिघांना २८ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर संशयितांनी चोरीचे सोयाबीन आणि ते नेण्यासाठी वापरलेले वाहन, असा चार लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल कोठे आहे त्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोकाॅ सतीश जाधव, दीपक आडे, अच्युत चव्हाण, सॅम्युअल गायकवाड, राम हाडे, दशरथ गोपणवाड, पोह अशोक गाढवे, चालक धोत्रे यांच्या पथकाने केली.