वडीगोद्री (जालना): "तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्हीही मागे हटणार नाही. आम्ही आरक्षण घेणारच!" असा ठाम इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. ते अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "यापुढे आंदोलन लोकशाही मार्गानेच होणार, पण शेवटची लढत निर्णायक असेल. एकतर आम्ही आरक्षण मिळवू, नाहीतर सरकार सत्तेत राहणार नाही," असे त्यांनी ठणकावले.
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आमदार आणि मंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतली नाही, तर त्यांना गावागावांत जाब विचारला जाईल. "मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे की या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा अध्यादेश त्वरित लागू करा," अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने फसवणूक केली - आता मराठे निर्णायक लढ्यासाठी तयार!"मराठ्यांचे मतशिवाय राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही. मात्र, सरकारने आमची १००% फसवणूक केली आहे. ओबीसी आरक्षणात समाविष्ट होण्यासाठी लागणारी अधिसूचना जाणीवपूर्वक उशिरा काढली गेली, त्यामुळे आमची फसवणूक झाली. मात्र, आता आम्हीही डाव टाकायला शिकलो आहोत," असे ते म्हणाले.
मुंबईत मोठ्या आंदोलनाचा इशारा"आम्ही मुंबईला जाणार नाही का? आम्हालाही पाहायचे आहे की मंत्री कुठे राहतात. गरीब शेतकऱ्यांनाही मुंबई बघायची आहे. मागच्या वेळी आम्ही मुंबईला जाऊन सुखरूप परत आलो, पण यावेळी तसे होणार नाही. सरकारने चारही बाजूंनी मार्ग बंद करूनही आम्ही आमचा हक्क मिळवणारच!" असे ते म्हणाले. "उन्हामुळे सध्या मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, पण योग्य वेळी सर्वांना धक्का बसेल," असा इशारा त्यांनी दिला.
जातीयवादाचा आरोप नको - आम्ही फक्त हक्क मागतोय!"आम्ही आरक्षण मागतोय म्हणजे आम्हाला जातीवादी ठरवू नका. गरिबांच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत. मात्र, आमच्या हक्काला विरोध करणारेच खरे जातीवादी आहेत," अशी टीका त्यांनी केली. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.