कोल्हापूर/किणी : पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाका येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव टॅँकरने कारला धडक दिल्याने जालना येथील व्यापारी जागीच ठार झाला. तसेच ट्रकचालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. गौतम मनोहर वाधवा (वय २४, रा. नाथनगर, जालना) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याचा मित्र प्रभात हरिप्रसाद देवीदान (२४, रा. जालना) व ट्रकचालक शब्बीर अबू शेख (२८, रा. बावधन, ता. वाई, जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले. भरधाव टॅँकरचा टायर फुटल्याने रस्ता दुभाजकावरून तो पलीकडील रस्त्यावर येऊन उलटला. यावेळी त्याने कारला व आणखी एका ट्रकला धडक दिली. या विचित्र अपघाताचे दृश्य पाहून वाहनधारकांच्या अंगावर शहारे उभे राहत होते. टँकर शिवपार्वती मिल्क ट्रान्स्पोर्टचा असून, तो मुंबईहून वारणानगरला येत होता. याबाबत अधिक माहिती अशी, गौतम वाधवा याचे जालन्यामध्ये कापड दुकान आहे. त्याच्यासह मित्र प्रभात देवीदान व जिमित व्यवहारे यांनी गोव्याला जाण्याचा बेत आखला. जिमित हा पुण्यामध्ये एम. बी. ए.चे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि. ४) गौतम, प्रभात हे दोघेजण कार घेऊन पुण्यामध्ये आले. तेथून जिमितला घेऊन मध्यरात्री ते गोव्यात पोहोचले. शनिवारी दिवसभर गोवा फिरून रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ते पुण्याला येण्यास निघाले. टोप-वाठारच्या दरम्यान हॉटेलवर तिघांनी दुपारचे जेवण केले.त्यानंतर ते पुन्हा पुण्याकडे रवाना झाले. यावेळी प्रभात कार चालवीत होता. त्याच्या डाव्या बाजूला जिमित बसला होता; तर गौतम हा पाठीमागे दरवाजाला उशी लावून झोपला होता. काही अंतर गेले असता किणी हायस्कूल ते टोलनाक्याजवळ पुण्याकडून भरधाव येणाऱ्या टँकरचा टायर फुटल्याने तो रस्ता दुभाजक तोडून उजव्या बाजूच्या रस्त्यावर येऊन उलटला. यावेळी ट्रँकरची कारच्या पाठीमागील दरवाजाला धडक बसल्याने गौतम जागीच ठार झाला. यावेळी या टँकरने आणखी एका ट्रकला धडक दिली. कारचालक प्रभात देवीदान व टँकरचालक शब्बीर शेख हे गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये टॅँकरसह कार व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गौतमचा मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आला. त्याच्या अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांचे पै-पाहुणे गांधीनगर येथे असल्याने त्यांनी ‘सीपीआर’मध्ये धाव घेतली. त्याचा मृतदेह पाहून आतेबहीण मेघाणी यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्या धक्क्याने काहीवेळ त्या बेशुद्ध पडल्या. मृत गौतमच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली. (प्रतिनिधी) किणी टोलनाका परिसर मृत्यूचा सापळा किणी टोलनाक्याजवळ काही दिवसांपूर्वी भरधाव कार दुभाजकाला धडकून अहमदाबाद येथील बांधकाम व्यावसायिक चिराग मनसुभाई पांचाल (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला होता; तर चौघेजण गंभीर जखमी झाले होते. मृत चिराग हा आणखी दोन मित्रांसोबत गोवा येथील मोटारसायकल शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना अपघात झाला होता. किणी टोलनाका परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून हा परिसर वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. बालपणीचे मित्रगौतम, प्रभात व जिमित हे बालपणापासूनचे मित्र. कोठेही फिरायला जायचे असेल तर तिघेजण जात होते. गोवा पाहून ते घरी परतत होते. पुण्यामध्ये जिमितला सोडून ते पुढे जालन्याला जाणार होते. जेवण करताना तिघेही बालपणीच्या गप्पांत रंगले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांत गौतमचा अपघाती मृत्यू झाल्याने दोघेजण भेदरून गेले. त्यांना आपण काय बोलतो हेच कळत नव्हते. इतर वाहनधारकांनी त्या दोघांना धीर देत ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.
टँकरची कारला धडक; जालन्याचा व्यापारी ठार
By admin | Updated: March 7, 2016 01:07 IST