आज शहरातील रस्त्यावरील श्वानांच्या घोळक्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनाच अनेकांनी साकडे घातले. श्वान मागे लागून आणि चावल्याने शहरात महिन्याला सरासरी शंभरापेक्षा अधिक घटना घडतात. श्वान मागे लागल्याने अनेकजण जायबंदी झाले असून, लहान-मोठे अपघातांत हे नित्याचीच बाब झाली आहे.
त्यासाठी आता पालिका आणि जिल्हा प्रशासन मिळून या मोकाट श्वानांसाठी कुठे तरी पाच ते सात एकर जागा घेऊन त्यांचा एकत्रित सांभाळ करण्याच्या मन:स्थितीत आहेत. परंतु ही अत्यंत अवघड जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न होता. तो प्रश्न सोडविण्यासाठी येथीलच काय, परंतु मराठवाडा विभागातील पहिली डॉग ट्रेनर-प्रशिक्षक म्हणून मृगनयनी मोहरीर शक्य तेवढे सहकार्य करण्यास तयार आहे. तिने डॉग ट्रेन म्हणून आपले नाव जालन्यात नाही तर मराठवाड्यात उंचावले आहे.
श्वान आणि भारतीयांचे नाते हे फार जुने आहे. अनेकांचा व्यवसाय हा शेती असल्याने शेतात गाय, बैलांप्रमाणेच एक ते दोन श्वान हे ठरलेलेच असतात. अत्यंत जीव लावणारी जात म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. धन्याचे सरंक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य म्हणून ते प्राणपणाने कर्तव्य बजावतात. याची अनेक उदाहरणे आहेत. भारतीय श्वानांप्रमाणेच आता परेदशातील ब्रीडीग केलेले आणि देखणे श्वान पाळण्याकडे समाजाचा कल वाढला आहे. हे श्वान जवेढे घातकी म्हणून ओळखले जातात तेवढेच ते मायाळू असल्याचे मोहरीर हिने नमूद केले.
चौकट
जबाबदारीसह तेवढीच प्रामाणिक जात
श्वान म्हटले की, विशेष करून लहान मुलांमध्ये त्यांचे जास्त ॲट्रेक्शन असते. त्याा श्वानाची काळजी ते मोठ्यांपेक्षा अधिक तत्परतेने घेतात. ज्याप्रमाणे श्वानांचे संगोपन हे शास्त्रशुद्ध कसे करावे याचे एक तंत्र आहे. ते तंत्र श्वानांमध्ये विकसित केले जाते. त्यानुसार ते वागतात. मुलांमध्ये जबाबदारी वाढणे, त्यांच्या प्रति असलेली माया आणि प्राणिमात्रांची काळजी घेऊन तेदेखील सृष्टीतील मानवाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक असल्याची जाणीव होते. सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे एक प्रशिक्षित डॉग हा दहा सुरक्षारक्षकांचे काम अत्यंत सतर्कपणे करतो. आपण भारतातील मुंबईस्थित प्रसिद्ध श्वानतज्ज्ञ आणि प्रशिक्षक सचिव रावते तसेच केरळमधील कर्नल डॉ. ई. आर. नायर यांच्याकडून घेतल्याचे मृगनयनीने आवर्जून सांगितले.