बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
अंबड : सततचे बदलते वातावरण, पडणारा अवकाळी पाऊस आणि खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गव्हासह हरभरा व इतर पिके धोक्यात आली आहेत. वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास गव्हासह इतर पिके हातची जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन
घनसावंगी : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक नितीन पाटील यांनी मार्गदर्शन केले. वाहतूक नियमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक उदय साळुंके, सहायक मोटार निरीक्षक राधा साेळुंके, इंगळे, आसाराम घुले, योगेश गायके, प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.
सिंधी पिंपळगाव येथे कुमठेकर यांचे व्याख्यान
जालना : तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत एकता शेतकरी कृषी विकास व बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त प्रा. डॉ. कुमठेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थाध्यक्ष नवनाथ लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा मान्यवरांच्याा हस्ते गौरव करण्यात आला.
तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात
जालना : शहरांतर्गत विविध भागातील नाल्या तुंबल्या आहेत. कचराही सार्वजनिक ठिकाणी साचल्याचे दिसून येत आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय साथरोगांचा धोकाही वाढला आहे. तरी नगर पालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.
तुषार गवळी यांचा पुरस्काराने गौरव
जाफराबाद : तालुक्यातील खापरखेडा येथील तुषार गवळी यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह, मानपत्र देवून गवळी यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र स्वगात होत आहे.