शहागड : कोरोनामुळे शाळेतील पोषण आहार शिजविणे बंद झाले असून, लाभार्थ्यांना आता तांदूळ, मसूरडाळ, मटकीचे घरपोच वाटप केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिकरित्या एकत्र येण्यास बंदी आहे. त्यामुळेच शालेय आहार वितरित करताना धोका होऊ नये म्हणून व शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत शालेय पोषण आहार घरपोच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळेला प्राप्त होणारा आहार विद्यार्थ्यांपर्यंत शाळांमधून पोहोचविला जात आहे. आहाराच्या माध्यमातून विद्यार्थी सशक्त व्हावे आणि त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून संपूर्ण आहार शिजविण्यासाठी घरीच देण्यात आला आहे. मोठ्या विद्यार्थ्यांना निकषानुसार सदर आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविली आहे.
शहागड केंद्रातील १४ शाळांत १ ते ५ पर्यंत १३६९ लाभार्थी, तर ६ ते ८वी पर्यंत ८४२ लाभार्थी विद्यार्थी अशी एकूण २,२११ लाभार्थी संख्या आहे. घरपोच आहार योजनेमधून शालेय विद्यार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये एक ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दर दिवसाला १०० ग्रॅम तांदूळ, २० ग्रॅम मसूर डाळ, २० ग्रॅम मटकी दिली जात आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ३० ग्रॅम मसूर डाळ, ३० ग्रॅम मटकी आणि १५० ग्रॅम तांदूळ वाटप केले जात आहे.
कोट
कोरोनामुळे घरपोच पोषण आहार दिला जात आहे. तांदूळ, मसूर डाळ, मटकी या वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांनी घरीच आहार शिजवावा आणि त्यांचे आरोग्यही जपावे, म्हणून घरपोच धान्य पुरवठा करण्यात येत आहे.
विपुल भागवत
गटशिक्षणाधिकारी, अंबड