अंबड : शहरातील मत्स्योदरी विद्यालयात शनिवारी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार विद्याचरण कडवकर, फुलचंद मेंगडे, डॉ. जगन्नाथ तलवाडकर, डॉ. विलास रोडे, पांडुरंग घोगरे आदींची उपस्थिती होती.
सेवानिवृत्तीबद्दल सलीम सय्यद यांचा गौरव
अंबड : मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचे प्रा. सलीम सय्यद नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल गौरव करून त्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय गणित परिषदेचे अध्यक्ष प्रा. भगवान इंगळे, प्रा. विनायत अली, प्रा. आनंद पवार आदींची उपस्थिती होती.
वर्गमित्रांचा जुन्या आठवणींना उजाळा
परतूर : शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात ३२ वर्षांपूर्वीचे वर्गमित्र स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. यावेळी एकमेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निवृत्त प्राचार्य भगवान दिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. यशवंत दुबाले, अरुणकुमार बाहेती, मनोहर सासवते, शेख हसन, सरोदे आदींची उपस्थिती होती.
पुलावर खड्डा
गोलापांगरी : जालना ते अंबडदरम्यान असलेल्या रस्त्यावर गोलापांगरी जवळील दुधना नदीवरील पुलावर मोठा खड्डा पडला आहे. रात्री- अपरात्री दुचाकीस्वारांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघात होत असून, वेळीच सदरील खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
जालना : तालुक्यातील गोंदेगाव फाट्यापासून गावापर्यंत असलेल्या रस्त्याची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांमधून समाधान
अंबड : तालुक्यातील दहीपुरी ते पराडा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. ग्रामस्थांमधून होणारी मागणी पाहता ताडहादगाव सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या गंगासागर पिंगळे यांनी स्थानिक निधीतून रस्त्याचे मातीकाम केले आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यात्रा महोत्सव
घनसावंगी : तालुक्यातील मासेगाव येथील तळ्यातील मारोती संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही १३ जानेवारी रोजी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे तंतोतंत पालन करूनच हा यात्रोत्सव घेतला जाणार आहे. तमाशा, पाळणे यासह करमणुकीच्या साधनांवर यात्रेत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
निकाळजेंना पुरस्कार
जालना : मदत सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा राजमाता अहिल्यादेवी होळकर समता पुरस्कार जालना शहरातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा निकाळजे यांना नुकताच देण्यात आला. रेखा निकाळजे यांचे आजवरचे असलेले सामाजिक कार्य पाहून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. शिवाय या पुरस्काराबद्दल निकाळजे यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सायकल रॅली
जालना : फिट इंडिया चळवळीअंतर्गत वाघ्रुळ येथील श्री रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड पथकामार्फत शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पर्यवेक्षक यू. जे. सहाने यांनी हिरवी झेंडी दाखविली. दरम्यान, चार किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी के. एल. पवार, एस. एल. खरात, एम. एस. कोरडे आदींची उपस्थिती होती.
सहविचार सभा
दाभाडी : शिक्षक भारतीच्या तालुका कार्यकारिणी निवडीबाबत बदनापूर शहरात सहविचार सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष दीपक दारडे हे होते. बैठकीत शिक्षक भारतीच्या तालुकाध्यक्षपदी सतीश नागवे तर सचिवपदी डिगांबर गाडेकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. याबद्दल देवेंद्र बारगजे, ज्ञानेश्वर राऊत, किशोर कदम, संतोष ताठे आदींनी नागवे व गाडेकर यांचे स्वागत केले.
अभिवादन कार्यक्रम
जालना : भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त युवाशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सावित्रीबाई फुले शिक्षण क्रीडा सेवाभावी संस्था यांच्या वतीने अहंकार देऊळगाव येथे भीमा कोरेगाव येथील लढाईत शहीद झालेल्या शूरवीरांना सलामी देऊन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राकॉं. सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस अमोल खरात, राजू खरात, गोविंद खरात, अरुण खरात, दीपक म्हस्के, सचिन खरात आदींची उपस्थिती होती.