जालना : राजामाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली होती. याबाबतचे पत्र जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पाठविले होते.
प्रशांत पुरी यांचा परतूर शहरात गौरव
परतूर : प्रशांत पुरी हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल माजी सैनिक संघटनेतर्फे त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत राखे होते. दरम्यान, विजय बोराडे यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी तुकाराम उबाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
शाळेला पाण्याच्या टाकीची भेट
राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथील डॉ.सुदर्शन थोटे यांनी घायाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला पाण्याची टाकी भेट दिली आहे. विशेष म्हणजे, डॉ.थोटे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. याबद्दल त्यांचे परिसरातून स्वागत होत आहे. यावेळी शरद थोटे, सदाशिव दारूवाले, दत्तात्रय घायाळ, विनोद दाभाडे आदींची उपस्थिती होती.
टरबुजावर रोगराई
अंबड : तालुक्यातील भार्डी, वडीकाळ्या, सुखापुरी गाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड केली आहे, परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बदला झाला आहे. याचा परिणाम टरबुजावर रोगराई पडण्यावर झाला आहे.
कॉर्नर बैठक
जालना : शहरात २४ जानेवारीला ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगल बाजार येथे कॉर्नर बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगरसेवक महमूद कुरैशी, सत्संग मुंडे, फिरोज बागवाण, अन्सार कुरेशी आदींची उपस्थिती होती.
उपाध्यक्षपदी अमोल राठोड यांची नियुक्ती
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील अमोल राठोड यांची गोर सेनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोर सेनेच्या कार्यकारिणीची नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबद्दल अरुण चव्हाण, नामदेव पवार, शाम राठोड, पंडित राठोड आदींनी अमोल राठोड यांचा गौरव केला.
सामाजिक उपक्रम
कुंभार पिंपळगाव : संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंभार पिंपळगाव येथील संताजी महाराज युवा मंचाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. प्रथम प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच टाळ- मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली, शिवाय महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गुटखा विक्री जोरात
तळणी : मंठा तालुक्यातील ठोकसाळ फाटा परिसरातील किराणा दुकान, हाॅटेल्स व पानटपऱ्यांमधून मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. त्यामुळे तरुण व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वेळीच याकडे संबंधितांनी लक्ष देऊन गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
संथगतीने काम
जालना : गैबनशहावाडीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेले रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. वेळीच या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर रावसाहेब गंगाधरे, पंकज खिल्लारे, किशोर ताजी, राजाभाऊ गाजरे, प्रल्हाद राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मोतीबिंदू तपासणी
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथे घेण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया या शिबिरात १४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ३४ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सरपंच गजानन पघळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बंडू बुलबूले, गणेश पघळ, सुरेश बुलबुले आदींची उपस्थिती होती.
अंबडमध्ये बैठक
अंबड : ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानांतर्गत सुंदर माझे कार्यालय ही संकल्पना राबविण्यासाठी शहरातील पंचायत समिती कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंतर्भूत कार्यालय, कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी डी.टी. भिसे, सुरेश भवर आदींची उपस्थिती होती.
शालेय साहित्य वाटप
जालना : युवाशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सावित्रीबाई फुले शिक्षण क्रीडा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहंकार देऊळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस अमोल खरात, दिलीप खरात, राजू खरात, नितिन म्हस्के, मंगेश खरात आदींची उपस्थिती होती.