जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचे मतदान १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. शिवाय निवडणूक क्षेत्रातील दुकाने, आस्थापने बंद राहणार आहेत.
ग्रामीण रुग्णालयातर्फे आरोग्य शिबिर
जाफराबाद : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एम. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. डॉ. पाटील यांनी रुग्णांना राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, कुटुुंब नियोजन शस्त्रक्रिया आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
शहागडमध्ये अखंड हरिनाम सप्ताह
अंबड : तालुक्यातील शहागड येथे ११ ते १८ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ह. भ. प. भाऊसाहेब जोशी, सोनाली करपे, रविदास चव्हाण, निवृत्ती देशमुख आदींची कीर्तने होणार आहेत, तर १८ जानेवारीला भागवताचार्य महेश हरवणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
ग्रामस्थांसोबत चर्चा
अंबड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अनिरूद्ध नांदेडकर यांनी दहीपुरी (ता. अंबड) येथे भेट देऊन ग्रामस्थांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. निवडणूक काळात गावात शांतता ठेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दारू विक्री वाढली...
तळणी : मंठा तालुक्यातील बेलोरा चौफुली परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्री वाढली आहे. सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. यातच सहजरित्या हॉटेल, ढाबे, टपऱ्यांवर दारू मिळत असल्याने मद्यपींच्या संख्येत वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर मिळेना !
तळणी : तळणी, जयपूर व दहीफळ खंदारे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनुदानासाठी शेतकरी चकरा मारत आहेत. परंतु, अनुदान वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत. विशेष म्हणजे बँकेतील कर्मचारी वेळेवर येत नसून, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सुरज कांबळे, राज पाटील, सरकटे आदींनी केली आहे.
हरभऱ्यावर फवारणी
राणी उंचेगाव : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदला आहे. या बदलामुळे हरभऱ्यावर घाटे अळी पडली आहे. अळीच्या नियंत्रणासाठी राणी उंचेगाव परिसरातील शेतकरी हरभरा पिकावर औषध फवारणी करीत आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने राणी उंचेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात यंदा रब्बी पिकांची पेरणी झालेली आहे.
रस्त्याची चाळण
तळणी : मंठा तालुक्यातील पूर्णा पाटी - इंचा - टाकळखोपा - वाघाळा या सहा किलोमीटर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाघाळा व टाकळखोपा येथून मोठ्या प्रमाणावर रात्री चोरटी वाळू वाहतूक केली जाते. या अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
शिक्षकांचे अप-डाऊन
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील एका महाविद्यालयातील काही शिक्षक औरंगाबाद व जालना येथून अप - डाऊन करीत आहेत. मागील काही दिवसांपासून नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, शिक्षक जालना आणि औरंगाबाद येथून येणे - जाणे करीत असल्याने पालकांमधून भीती व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर सांडपाणी
जाफराबाद : तालुक्यातील रेपाळा गावातील रस्त्यावरून सांडपाणी वाहात आहे. त्यामुळे गावात ये - जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली नसल्याने सांडपाणी एकाच ठिकाणी साचून राहाते. परिणामी गावात डासांची संख्या वाढली आहे. शिवाय ग्रामस्थांना कचरा टाकण्याचीही कोणतीच व्यवस्था नाही.
अध्यक्षपदी लगड
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील संजय लगड यांची शिवसरपंच सेवा संघाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष जयश्री शुक्ला यांनी त्यांची नियुक्ती केली. याबद्दल कानिफनाथ सावंत, राजेंद्र शेंडगे, दिलीप लगड, गुरुप्रसाद लगड आदींनी त्यांचे स्वागत केले.