अनेक गावांमध्ये युवक उमेदवार हे ज्येष्ठांच्या हातापाया पडून यंदा संधी द्या, अशी विनवणी करताना दिसून येत आहेत. मतदानासाठी त्यांच्या ज्या पॅनलला जी चिन्ह मिळाली आहेत, त्याचे स्टिकर बनवून मतदारांना देत आहेत. एकूणच या निवडणुकीतील युवकांचा उत्साह पाहून गावातील प्रस्थापितांना ऐन थंडीतही घाम फुटला आहे. चालू वर्षापासून पंचायतराज योजनेअंतर्गत आता पंधराव्या वित्त आयोगातून जो निधी मिळतो, तो आता त्या त्या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने आता जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा ग्रामपंचायत सदस्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे गटात चुरस होणार आहे. तसेच जालन्यात काँग्रेसविरुद्ध शिवसेना अशी लढत राहणार असून, भाजपही जोर लावून रिंगणात उतरली आहे. परतूर तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर विरुद्ध माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया अशी लढत राहणार असून, मंठा तालुक्यात आमदार राजेश राठोड यांनीदेखील भाजपला चांगलेच गोत्यात आणले आहे. घनसावंगी तालुक्यात पालकमंत्री राजेश टोपे यांना माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते विलास खरात आणि टोपेंचे प्रतिस्पर्धी हिकमत उढाण हे टक्कर देत आहेत. बदनापूर तालुक्यात आमदार नारायण कुचे, माजी आ. संतोष सांबरे हे लक्ष ठेवून आहेत. या भागात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष गजानन गिते हेदेखील मैदानात उतरले आहेत.