जालना : कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज आहे. त्याअनुषंगाने राज्यात लसीकरणाचे ड्राय रन घेतले जात आहे. देशातील एका कंपनीची लस तयार असून, लवकरच लसीकरणाला सुरूवात होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शनिवारी जालना जिल्ह्यातील तीन केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. जालना शहरातील शासकीय रूग्णालयातील केंद्राला आरोग्यमंत्री टोपे यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, देशात आठ कंपन्यांमार्फत कोरोनाची लस तयार केली जात आहे. यात सिरम व भारत बायो इंटरनॅशनल लिमिटेड हैद्राबाद या कंपन्यांनी फेज ३ पूर्ण केले आहे. इतर कंपन्यां फेज २ मध्ये आहेत. फेज ३ पूर्ण झालेल्या एका कंपनीची लस पूर्णपणे तयार आहे. ही लस देण्यासाठी राज्य सरकार तयार असून, त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
लसीकरण केंद्राची रचना मतदान केंद्रासारखीच असेल, आपण मतदान करण्यासाठी केंद्रावर जातो, त्यावेळी तिथे आपली पहिली भेट पोलीस कर्मचाऱ्यांशी होते. लसीकरण केंद्रावर देखील पोलीस असतील. ते ओळखपत्र तपासतील. लसीकरण केंद्रात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असेल. त्याशिवाय केंद्रात प्रवेश करता येणार नाही. पोलिसांना ओळखपत्र दाखवल्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंटिफिकेशन रुममध्ये जाईल. तिथे शिक्षक किंवा शिक्षिका असतील. ज्यांना लसीकरणासाठी मेसेज पाठवण्यात आला आहे, तीच व्यक्ती केंद्रावर आली आहे का, याची पडताळणी शिक्षक/शिक्षिकेकडून कोविन अॅपच्या माध्यमातून केली जाईल, असेही टोपे म्हणाले.
पडताळणी झाल्यानंतर लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन किंवा तीन प्रशिक्षित नर्स असतील. त्या ठराविक तापमानात ठेवण्यात आलेली लस संबंधित व्यक्तीच्या दंडाला टोचतील. त्यानंतर त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवले जाईल. काही व्यक्तींना ताण-तणावाची समस्या असते. काही जण लगेच अस्वस्थ होतात. त्यामुळे त्यांना भोवळ येऊ शकते. असा काही प्रकार घडल्यास लसीकरण केंद्रावर बेड, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा उपलब्ध असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीचे निरीक्षण करण्याचे काम आशा वर्कर्स, अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला करतील, अशी माहिती टोपेंनी दिली. कोरोनाची लस घेतल्यानंतर बिनधास्त फिरता येईल, असा अनेकांचा समज झालेला आहे. याबद्दलची शंका देखील टोपेंनी दूर केली. कोरोनाची लस घेतली की निर्धास्तपणे फिरायला मोकळे, असे अनेकांना वाटू लागले आहे. पण कोरोनाची लस घेतल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळणे गरजेचे आहे, असे टोपे म्हणाले.
जालन्यात रंगीत तालीम यशस्वी
जालना जिल्ह्यातील तीन केंद्रांवर शनिवारी रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हा रूग्णालय जालना, जिल्हा रूग्णालय अंबड, सेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्राय रन घेण्यात आला. यावेळी प्रत्येक केंद्रावर २५ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सकाळी ९ वाजेच्या सुमारास रंगीत ड्राय रनला सुरूवात झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाने लसीकरण केंद्राची सजावट केली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.