अंबड : तुझे लग्न जमण्यासाठी तुला पूजा करावी लागेल. तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, यासाठी तू आम्हाला ऑनलाईन पैसे पाठव, असे म्हणून पाचजणांनी तरुणीला चार लाख ३५ हजार ४०० रुपयांना लुटल्याची घटना अंबड तालुक्यातील रामनगर तांडा येथे शनिवारी (दि. ९) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून पाचजणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित २४ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह रामनगर तांडा येथे राहत असून, जालना येथील एका खासगी कंपनीत ती ऑपरेटर आहे. काही दिवसांपूर्वीच वडिलांनी एक एकर शेती विकून तिच्या खात्यात तीन लाख सात हजार ३१० रुपये जमा केले होते. लग्न होत नसल्याने ती हैराण होती. लॉकडाऊनच्या काळात शेअर चॅट पाहत असताना तिला एक जाहिरात दिसली. जाहिरातीमध्ये असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर तिने ‘गुरुजी वेदनाम प्रॉब्लेम हेल्प’ असा संदेश पाठविला. तरुणीने संबंधित व्यक्तीला सगळे प्रॉब्लेम सांगितले. तुझे लग्न जमण्यासाठी पूजा करावी लागेल, यासाठी तू मला पैसे पाठव, असे म्हटल्यानंतर तरुणीने संबंधित व्यक्तीला ऑनलाईन पैसे पाठविले. काही दिवसांनी बाबाजी गुरुजी नावाच्या व्यक्तीसह अन्य चौघांनी वेगवेगळी कारणे सांगून वेळोवेळी पैशांची मागणी केली.
पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
या तरुणीने जवळपास पाचजणांना चार लाख ३५ हजार ४०० रुपये पाठविले आहेत. या प्रकरणी शनिवारी रात्री तरुणीच्या फिर्यादीवरून बाबाजी गुरुजी, नरेश गुरुजी, विकास कुमार भार्गव, शिष्य सुरेश, सफीकुल रहेमान या पाचजणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर करीत आहेत.