शेतकऱ्यांचा सवाल; अतिवृष्टीने खरीप गेलं, गारपिटीने रब्बी जमीनदोस्त झालं
फकिरा देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच आता गारपिटीने रब्बी हंगामातील पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. ‘साहेब, आता तुम्हीच सांगा, आम्ही कसं जगावं’, असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.
भोकरदन शहरासह तालुक्यातील इब्राहिमपूर, मुठाड, मालखेडा, आव्हाना, गोकुळ, पेरजापूर, नांजा, सुभानपूर, आलापूर, मलकापूर, वाडी बु., वाडी खु., फत्तेपूर, मानापूर, विरेगाव आदी ठिकाणी गुरूवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. सकाळपासून कडक ऊन जाणवत होते. मात्र, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यातच तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट व पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या परिसरातील संपूर्ण शेती पांढरीशुभ्र झाली. सर्वत्र गारांचे खच साचले होते. त्यामुळे हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील गहू, कांदा, सिड्स, हरभरा, मका, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गारपिटीत इब्राहिमपूर येथील सुपडसिंग राजपूत, सिधूसिंग डोभाळ यांच्या १० एकरावरील कांदा सिड्सचे मोठे नुकसान झाले. इब्राहिमपूर येथीलच महाराणी गोमलाडू यांचा दीड एकर गहू, सरपंच रामसिंग डोभाळ यांचा आठ एकर मका व विजय बरवाल यांचा ३ एकरवरील मका आडवा झाला. मालखेडा येथील रामसिंग घोडके, गजानन घोडके यांच्या गहू व कांदा सिड्सचे मोठे नुकसान झाले आहे. ठालेवाडी येथील गणेश ठाले, उदलसिंग चुगडे, संतोष चुगडे, अनिल काळे यांच्या शेतातील पिकेही आडवी झाली आहेत. बाबूसिंग महेर, इदरसिंग जारवाल, कृष्णा बुरगे, रामेश्वर जाधव, सुदाम खेकाळे यांचेही मोठे नुकसान झाले. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
नागरिकांची धावपळ
तालुक्यातील १५ ते २० गावात गुरूवारी दुपारी अचानक गारपिटीसह वादळी पाऊस सुरू झाला. यामुळे शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजुरांची धावपळ उडाली. या गारपिटीमुळे अनेक पक्षी मृत्यूमुखी पडल्याचे सांगण्यात आले. कृषी व तहसील कार्यालयाने झालेल्या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
तडेगाववाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
भोकरदन : शेतात मका जमा करत असताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील तडेगाववाडी येथे गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल रायसिंग सुंदरडे (वय ३०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर तडेगाववाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जाफराबादेतही मोठे नुकसान
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यालाही गारपिटीचा तडाखा बसला आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील नळविहिरा, खामखेडा, सावंगी, गोंधनखेडा, भातोडी, हिवरा, बोरखेडी, आळंद, सावरगाव, काळेगाव, खानापूर, कुंभारझरी, डोलखेडा, वरखेड, निवडुंगा, आंबेगाव आदी गावांमध्ये गारपीट झाली. शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे, कल्याण जाधव यांनी केली आहे.