नियोजनाचा अभाव : सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत दोन हजार रुपये काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच झुंबड केल्याचे मंगळवारी पाहावयास मिळाले.
तळणीसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत आलेले दोन हजार रुपये काढण्यासाठी ग्रामीण बँकेत प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. या बँकेत मागील दोन महिन्यांपासून शाखा व्यवस्थापक नसल्याने कोणतेच नियोजन झाले नाही. बँकेत ग्राहकांची संख्या जास्त अन् कर्मचारी संख्या कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच पीएम किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकेत एकच झुंबड होत आहे. या ठिकाणी अनेक जण विनामास्क होते, तर सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून आले. तळणीसह परिसरातील ५० हून अधिक कोरोना रुग्ण असल्याने ग्रामीण बँकेतील होणारी प्रचंड गर्दी कोरोना स्प्रेडर ठरतेय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन महिन्यांपासून शाखा व्यवस्थापक नाही
या शाखेत दोन महिन्यांपासून शाखा व्यवस्थापक नाही. तत्कालीन शाखा व्यवस्थापक बुधवंत यांची येलदरी (ता. जिंतूर) येथे बदली झाल्यानंतर कोणताच शाखा व्यवस्थापक तळणीला येण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तळणी येथे दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहत असून, यातील किराणा, मेडिकल, भाजीपाला यांसह अनेक दुकानांवर गर्दी होत आहे. या गर्दीकडे तळणी पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.