केदारखेडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी अद्याप कोणत्याच पॅनलचे उमेदवार अंतिम झालेले नाहीत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदान होईपर्यंत येणारा खर्च पॅनल प्रमुखांकडे असल्याने उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात आपल्या भाऊबंदकीतील मतदारांची आकडेमोड करता करता इच्छुकांच्या नाकीनऊ आले आहेत. या भाऊबंदकीच्या नादात ज्ञान, शिक्षण, वर्तणूक या बाबींना तिलांजली दिली जात आहे. केदारखेडा येथील ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीत नऊ जागांसाठी अधिक जोर दोन्ही पॅनलकडून लावला जात आहे. भाजपापुरस्कृत दोन्ही पॅनल समोरासमोर लढत असले तरी भाजपाच्या एका गटाने राष्ट्रवादीचा आधार घेतला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार ? हे मतदार राजाच्या हातात आहे. प्रचारासाठी ११ दिवस असल्याने आतापासूनच प्रचाराचा धुराळा उडत आहे. अनेक वर्षे ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात असूनही पुन्हा गावाचा विकास करण्याची भाषा वापरली जात आहे. यावर काहींनी मग इतके दिवस काय केले ? असा खोचक सवाल सोशल मीडियावर विचारणे सुरू केले आहे. दोन्ही पॅनलमध्ये भाजपाचे कार्यकर्ते पॅनलप्रमुख असून, जुन्या विरुध्द नवा असा सामना रंगत आहे. होणारी निवडणूक विविध बाजूंनी रंगतदार होणार असली तरी सुज्ञ मतदार कोणाच्या पदरात संक्रांतीचे वाण टाकणार ? हे १८ जानेवारीलाच समोर येणार आहे.
भाऊबंदकी दाखवा अन् तिकीट मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST