भोकरदन : भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता ३०० ते ३५० रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित केला आहे. त्याविरोधात भोकरदन येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी गुरुवारी रुमणे आंदोलन केले. त्यानंतर लगेचच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
महावितरण कंपनीच्या वतीने वीज खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांची रबी पिके सुकू लागली आहेत. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे, विकास जाधव, सरपंच नारायण साबळे यांच्या नेतृत्वाखाली रुमणे आंदोलन केले. वीज खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वीज जोडणी करण्याच्या कामाला लागले आहेत. यावेळी शंकर महाराज राऊत, प्रदीप शिंदे, संदीप भोकरे, अनिल साबळे, तुळशिराम साबळे, शिवराम जऱ्हाड, स्वप्नील खरात, प्रभुदेवा सपकाळ, प्रकाश सपकाळ, नारायण बकाल, विजय चिंचपुरे, किरण जाधव, कृष्णा मुरकुटे, शिवाजी थोरात, बंडू जाधव, कृष्णा लोखंडे, नारायण सोनुने, राजू ढोके आदी सहभागी झाले होते.