प्रशासनाने वाळू घाटांचे लिलाव करून वाळू वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. परंतु, वाळूची वाहतूक करणारे वाहनधारक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. वाळू वाहतूक करण्यासाठी वाहनधारक विना नंबर प्लेटची वाहने वापरत आहेत. काही वाहनांना साईड इंडिकेटर, साईड ग्लास नसल्याचेही दिसून आले आहे. अनेक वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू नेत आहेत. त्यासाठी फाळक्यांची उंची वाढविण्यात आली आहे. तर काही वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवित आहे. यामुळे वाळूचे कण दुचाकी चालक व पादचाऱ्यांच्या डोळ्यात जात आहेत. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मंठा शहरातील मंठा ते उस्वद रस्ता अरूंद आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. असे असतानाही वाळूची वाहतूक करणारी वाहने या रस्त्याने भरधाव वेगाने चालविली जात आहेत. याकडे आरटीओंनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मंठ्यात वाळू वाहतुकीसाठी नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST