पळस, आम्रवृक्षांची मनसोक्त उधळण : रान बनले सुवासिक
टेंभुर्णी : ‘आला शिशिर संपत पानगळत सरली... ऋतुराजाची चाहूल झाडा-वेलींना लागली’ या कवितेच्या ओळींची आठवण व्हावी, अशी निसर्गाची मनसोक्त उधळण सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. वसंतला ऋतुराज म्हटले जाते. वसंताच्या स्वागतासाठी जणू सर्व निसर्ग बेचैन झालेला असतो.
वसंत पंचमी झाली की, निसर्गाला ऋतुराजाच्या आगमनाचे वेध लागते. नुकतीच वसंत पंचमी झाली. एकीकडे शिशिराची पानगळ सध्या सुरू असताना, आगीच्या गोळ्याप्रमाणे लालबुंद दिसणाऱ्या पळस फुलांनी संपूर्ण रान फुलून गेले आहे. त्या फुलांतून रसकंद घेण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांची अलगद किलबिलाट त्यात आणखी जीव ओतीत आहे, तर दुसरीकडे जागोजागी मोहराने लदलेल्या आम्रवृक्षांनी संपूर्ण रान सुवासिक करून टाकले आहे. वसंताच्या स्वागतासाठी कुणीतरी सुवासिक धुनी पेटवावी, असा भास सर्वांना होत आहे. त्यातच आम्रवृक्षांच्या फांदीवर बसून सुमधुर आवाज काढणारी कोकिळा जणू वसंत गीत गाऊन सर्वांना मोहीत करीत आहे.
हळूहळू ऊन तापायला लागले असताना, सोंगणी-मळणीच्या कामाने थकून गेलेल्या आमच्या बळीराजाच्या मनाला निसर्गातील ही फुलांची उधळण काही वेळ गारवा देऊन जात आहे. आणखी काही दिवसांत रानावनातून काटेशेवर, पांगारा, रिठा आदी वृक्ष आपल्या मनसोक्त फुलांची उधळण करणार आहे अन् पाहता-पाहता वसंतोत्सवाच्या या रंगात रंगपंचमीचेही रंग फिके पडावे, अशा मनसोक्त रंगांंच्या उधळणीत निसर्ग न्हाऊन निघणार आहे.
===Photopath===
210221\21jan_25_21022021_15.jpg
===Caption===
वसंतच्या आगमनासाठी पळस अशी फुलांची उधळण करीत आहे.