लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील सोनलनगर परिसरातील गणेश भवर यांच्या घरावर दीड महिन्यापूर्वी डल्ला मारणाऱ्या एका चोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. स्वप्नील ऊर्फ मोगली रमेश कुलकर्णी (२१. रा. नागसेननगर उस्मानपुरा, औरंगाबाद) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जालना शहरातील सोनलनगर परिसरात ११ सप्टेंबर रोजी भरदिवसा गणेश भवर यांच्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन रोख रक्कमेसह एक रिव्हॉल्व्हर व जिवंत राऊंड असा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली की, औरंगाबाद येथील सराईत आरोपी स्वप्नील कुलकर्णी यांने साथीदारासह सदरील चोरी केली आहे.या माहितीवरून त्यांनी औरंगाबाद येथे पथकाला पाठवून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, फौजदार जयसिंग परदेशी, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, समाधान तेलंग्रे, सचिन चौधरी, विलास चेके, ज्योती खरात यांनी केली.साथीदाराचा शोध सुरुस्वप्नील आणि त्याच्या एका साथीदाराने ही चोरी केली असल्याची कबुली स्वप्नीलने दिली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्वप्नीलच्या साथीदाराचा शोध घेत आहे.
रिव्हॉल्व्हर चोर अटकेत, १९ जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:23 IST