भोकरदनमध्ये बेशिस्त चालकांवर कारवाई
भोकरदन : शहरातील विविध भागात वाहने बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्यांसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ४२ चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांकडून शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
परीक्षा आवेदन पत्रासाठी मुदतवाढीची मागणी
जालना : दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखेत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडे केली आहे. ही आदेवनपत्रे ऑनलाईन भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
गोंदी पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक
गोंदी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात परिसरातील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे, अवैध धंद्यांना लगाम लावण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस पाटलांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उत्कृष्ट कामाबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार
जालना : दक्षिण-मध्य रेल्वेच्या सुरक्षा सप्ताहात नांदेड विभागाला उत्कृष्ट रेल्वे रूळ, उत्कृष्ट सुरक्षा, नवकल्पना पुरस्कारासह सर्वधिक अठरा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये जालना विभागात कार्यरत शेख युसूफ, महेंद्र जीतसिंह, विनोद प्रकाश यांचा उत्कृष्ट कामाबद्दल विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंह यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.