जालना : नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी प्रकल्पाच्या पाइपलाइनला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी पालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून, पुढील काही दिवस नवीन जालना भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
घाणेवाडी प्रकल्पातून नवीन जालना भागाला पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, या पाणीपुरवठा पाइपलाइनला चार ठिकाणी मोठी गळती लागली आहे. तांदुळवाडी जवळ दोन ठिकाणी तर कन्हैयानगरजवळील पुलाजवळ दोन ठिकाणी ही गळती लागली आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. ही बाब पाहता पाणीपुरवठा सभापती पूनम राज स्वामी यांनी तातडीने पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जात आहे. या कामामुळे सोमवारी सकाळपासून नवीन जालना भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हा पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत केला जाईल, असे पणीपुरवठा सभापती पूनम राज स्वामी यांनी सांगितले.