भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील श्री वैष्णव परिवाराच्यावतीने गुरुवारी आयोजित ‘व्यसनमुक्ती’ कार्यक्रमात गायत्री सावजी बोलत होत्या. यावेळी ज्ञानेश्वर माउली, संदीप पंडित, गोकूळ सपकाळ, श्रीरंग खडके, शेनफड बारोटे, नीलेश बारोटे, सुशील बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम संत गजानन महाराज व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांच्या काळात आई- बहिणी सुरक्षित होत्या. त्यांच्या अब्रुवर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न केला तर भर चौकात त्या आरोपीचा चौरंगा केला जात होता. आज प्रत्येक दिवशी भरदिवसा शेकडो आई- बहिणींची अब्रू लुटल्या जात असल्याच्या घटना विविध वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी मिळतात. यासाठी आज देशात पुन्हा एकदा छत्रपती शासन आणण्याचीदेखील गरज असल्याचे मत गायत्री सावजी यांनी व्यक्त केले.
चौकट
आज देशात शिवरायांच्या नावाखाली राजकारण केल्या जात आहे; मात्र शिवरायांनी कधीही जातीयतेला थारा लागू दिला नाही. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली; परंतु आज राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण केले जात आहे. धर्मा-धर्मात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही खूप मोठी शोकांतिका असून, आपण शिवरायांच्या मातृभुमीत जन्म घेतला आहे, यासाठी आपण शिवरायांचे विचार अमलात आणून जीवन जगले पाहिजे, असे आवाहनही गायत्री सावजी यांनी केले.
फोटो ओळ - शेलूद येथे व्यसनमुक्ती कार्यक्रमात शिवव्याख्यात्या गायत्री सावजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेलुदकर महाराज यांच्यासह उपस्थित नागरिक.