लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या पाच वर्षात शिक्षणाला अच्छे दिन आले होते. कधी नव्हे एवढे जीआर मागील सरकारने काढले. जीआर काढणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सरकारनेच घरी बसवले. जेवढे जीआर काढले त्यापैकी एकही जीआर शिक्षकांच्या फायद्याचा ठरला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शिक्षणाला अच्छे दिन नव्हे तर चांगले दिवस नक्की येतील, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी गुरूवारी जि.प.मध्ये आयोजित शिक्षक दरबार कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी शिक्षकांनी आपल्या अनेक समस्यांचा पाढा आ. काळे यांच्यासमोर वाचला.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, सभापती दत्ता बनसोडे, जि.प. सदस्य जयमंगल जाधव, सोपान पाडमुख, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी तांगडे, उपशिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्यासह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.पुढे बोलताना आ. काळे म्हणाले, सध्या खाजगी शाळाच्या अनुदानाचा प्रश्न भेडसावत आहे. आमच्या सरकारने १०० टक्के अनुदान दिले होते. परंतु, भाजप सरकारने २० टक्केच अनुदान दिले. त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून १०० टक्के अनुदानाची मागणी करण्यात येत आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार शाळांना टप्प्याने अनुदान देणार नसून १०० टक्के अनुदान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी मागणी आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार आहोत. जुन्या पेन्शन योजनेसाठी असलेल्या जाचक अटी हटवून १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.चट्टोपाध्याय निवड श्रेणीची प्रकरणे जिल्हा परिषदस्तरावरच निकाली काढण्यात येतात. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चट्टोपाध्याय निवड श्रेणीची प्रकरणे निकाली काढावीत. शिक्षणाधिकाऱ्यांनी या कामी हलगर्जीपणा करू नये, असेही ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांची वैद्यकीय देयके प्रलंबित आहे. अनेक शिक्षक वैद्यकीय देयके निकाली काढण्याची मागणी करतात. परंतु, अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित असलेली शिक्षकांची देयके निकाली काढावी. अधिका-याने सेवा संपल्यानंतरही आपले नाव निघेल, असे काम करावे. जिल्ह्यात विद्यार्थीं संख्या नसतानाही ६ वी, ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.हे वर्ग तात्काळ बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. या प्रश्नाकडे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, असे सांगून ते म्हणाले की, लवकरच रिक्त पदेही भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षकांनी मांडल्या समस्याआमदार विक्रम काळे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर शिक्षकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. शिक्षक विलास इंगळे यांनी सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न मांडला. ते म्हणाले की, अर्ज करूनही मला ‘क’ वर्गात घेण्यात येत नाही. अनेकवेळा अर्ज केला. परंतु, याकडे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आ. काळे यांनी शिक्षणाधिका-यांना ३० जानेवारीच्या आत सुनावणी घेऊन विलास इंगळे यांना ‘क’ वर्गात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर इतर शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या.
शिक्षकांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:00 IST