जालना : येथील मुख्य टपाल कार्यालयातर्फे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शहरातील विविध मार्गांवरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुलींनी विविध वेशभूषा करून सहभाग घेतला होता.
ही रॅली शहरातील मुख्य टपाल कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, टांगा स्टँड, बडी सडकमार्गे काढण्यात आली. रॅलीचा मुख्य टपाल कार्यालयात समारोप करण्यात आला. यावेळी प्र. अधीक्षक शिवा नागाराजू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजाच्या जडणघडणीत आई, पत्नी, बहीण, मुलगी यांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे सर्वांनी मुली व महिलांचा आदर करावा, असे आवाहन नागाराजू यांनी केले. या कार्यक्रमासाठी औरंगाबादेतील पोस्टमास्टर एस. बी. भुजाडे, गणेश पारीपिल्ली, डी. डी. खैरे, पोस्ट अधिकारी आर. बी. गवळी, पौर्णिमा ओठखिंडीकर, के. आर. ससे, जब्बार खान आदींनी परिश्रम घेतले.