कारागृहातील महिला कैद्यांना साडी वाटप
जालना : जालना जिल्हा कारागृह वर्ग-१ मधील महिला कैद्यांना गणतंत्र दिनानिमित्त इंडियन ख्रिश्चन्स युनायटेड ब्रिगेड आणि गॉड्स लॅम्ब जिजस क्राईस्ट चर्च यांच्या वतीने साड्या वाटण्यात आल्या. यावेळी इंडियन ख्रिश्चन्स युनायटेड ब्रिगेडचे अध्यक्ष पी. रविकांत दानम, सचिव लेवी निर्मळ, गॉड्स लॅम्ब जिजस क्राईस्ट चर्चचे अध्यक्ष रेव्ह. सी. जी. भाकरे, जिल्हा कारागृह वर्ग-१ अधीक्षक अरुणा मुगुटराव, उपअधीक्षक आशिष गोसावी, सपोनि. सचिन पाटिल, दिनकर माने यांची उपस्थिती होती.
शहीद भगतसिंग विद्यालयात
शनिवारी ‘बालसंवाद’ कार्यक्रम
जालना : दरेगाव येथील शहीद भगतसिंग हायस्कूल आणि साने गुरुजी कथामाला जालनातर्फे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सकाळी नऊ वाजता ‘बालसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटू संघटनेचे राज्य सचिव अण्णा सावंत हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते राहतील. बालसंवाद कार्यक्रमात शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाचे विद्यार्थी वैष्णवी चुनखडे, दर्शन शिंदे हे महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या जीवनकार्याचा परिचय भाषणातून करून देणार आहेत.
सात जणांची चार महिलांना मारहाण
सात जणांविरोधात परतूर पोलिसांत गुन्हा दाखल
परतूर : मासेमारी करणाऱ्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रोहिणा येथे घडली. परतूर तालुक्यातील रोहिणा येथील मासेमारी करणारे निवृत्ती लिंबुरे यांच्या घरी जाऊन संशयित आरोपी नाना लक्ष्मण काळे, लक्ष्मण काळे, विठ्ठल पवार, गीता विठ्ठल पवार, श्रावण लक्ष्मण काळे, राहुल ऊर्फ खोबऱ्या काळे यांनी २७ जानेवारी रोजी घरात घुसून राजुबाई सोनाजी लिंबुरे यांच्यासह घरातील तीन महिलांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात निवृत्ती लिंबुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती लिंबुरे हे तक्रार देण्यासाठी ठाण्यात आले असता, यावेळी मारहाण करणारे लोक व त्यांचे नातेवाईक ठाण्यासमोर गोळा झाले. गुन्हा दाखल होईल, या भीतीने आन्साबाई लक्ष्मण काळे व गीता पवार या दोन महिलांनी ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेखा जंजाळ यांचा सत्कार
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथून जवळच असलेल्या भायडी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या रेखा जंजाळ यांचा नुकताच भाजपचे सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश ठाले यांच्या निवासस्थानी संगीता ठाले यांनी सत्कार केला.