विजय मुंडे
जालना : स्वप्नातील घरावर लाखो रूपये खर्च केले जातात. परंतु, त्या घराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची असलेली कुलपं केवळ १०० ते ३०० रूपयांच्या दरम्यानची खरेदी केली जातात. त्यामुळे चोरटे अशी कुलपे सहज तोडून घरातील लाखोंचा ऐवजही लंपास करीत आहेत.
स्वप्नातलं घर बांधण्याची इच्छा प्रत्येकाचीच! नव्हे घराचे बांधकाम करताना लहान सहान बाबींवर लक्ष दिले जाते. त्यामुळे दहा लाखांच्या खर्चाचे नियोजन बारा लाखाहूनही पुढे जाते. घरातील लहान-
सहान बाबी आकर्षक आणि चांगल्या व्हाव्यात, असा प्रत्येकाचाच अट्टाहास! परंतु, याच लाखमोलाच्या घरासाठी वापरली जाणारी कुलपे ही केवळ १०० ते ३०० रूपयांची खरेदी केली जातात. फारफार ५०० रूपयापर्यंतची कुलपे शहरातील बाजारपेठेत येणारे ग्राहक मागत असल्याचे व्यावसायिक सांगतात. साध्या कुलपांची मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. तर डेडबोल्ट लॉक, कॅम लॉक, नॉब लॉकमधील दर्जेदार कुलूप खरेदी करण्याकडे शहरासह परिसरातील ग्राहकांचा कल नसल्याचे सांगण्यात आले.
शहरासह जिल्हाभरात घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०१९ मध्ये वर्षभरात २०७ घरफोड्या झाल्या होत्या. चालू वर्षातील ११ महिन्यातच २६० घरफोड्यांच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. गत दोन वर्षातील या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. घराबाहेर जाताना अनेकजण घराला साधे कुलूप लावतात. ही साधी कुलपं चोरट्यांना तोडता येतात किंवा बनावट चावीद्वारे चोरटे काही क्षणात कुलूप उघडून घरातील लाखो रूपयांच्या ऐवजावर हात साफ करतात. त्यामुळे आपल्या घराची सुरक्षितता अधिक चांगली रहावी, यासाठी चांगल्या दर्जाचे कुलूप खरेदी करणे गरजेचे आहे. चांगले कुलूप लावण्यासह आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीसह इतर पर्यायी उपाययोजनाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
११ महिन्यात झाल्या २६० घरफोड्या
सन २०१९ मध्ये वर्षभरात २०७ घरफोड्या झाल्या होत्या. त्यात दिवसा २४ तर रात्री १८३ घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील ३९ घटनांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. चालू वर्षातील ११ महिन्यातच जिल्ह्यात २६० घरफोड्या झाल्या आहेत. यातील २८ घरफोड्या या दिवसा तर २३२ घरफोड्या या रात्री झाल्या आहेत. दाखल गुन्ह्यांपैकी पैकी ६४ प्रकरणांचा तपास लागला आहे. त्यामुळे आपले घर अधिक सुरक्षित राहण्यासाठी चांगली कुलपे वापरणे गरजेचे आहे.