राजूर : गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प यावर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे चांधई एक्को व बाणेगांव येथील मध्यम प्रकल्प तहानलेलेच होते. या दोन्ही प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, चांधई एक्को, चांधई टेपली, बाणेगांव, खामखेडा, थिगळखेडा, चांधई ठोंबरी, चिंचोली निपाणी, लोणगांव, जावळेवाडी आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो. पावसाअभावी धरण कोरडे असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. तसेच शेतकऱ्यांना रबीचा हंगाम साधता आला नव्हता. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने धरण भरण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाल्याने आसपासच्या ग्रामस्थांची पाणी समस्या मिटली आहे. सध्या बाणेगाव प्रकल्पाचे पाणी जालना भोकरदन मुख्यरस्त्याला लागले आहे.या प्रकल्पाची अजून दीड मीटर भिंंतीचे काम बाकी आहे. मात्र बाणगंगा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात न आल्याने अद्याप भिंतीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असते, तर मुख्यरस्ता पाण्याखाली गेला असता अशी परिस्थीती सध्या निर्माण झालेली आहे. अंदाजपत्रकात भोकरदन रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची तरतूद केलेली असताना काम कोणत्या कारणामुळे रखडले, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमधून केली जात आहे. (वार्ताहर)
१५ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला
By admin | Updated: October 12, 2016 23:55 IST