ही परीक्षा आधी १४ मार्चला होणार होती, परंतु कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. ती आता रविवारी होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. कोरोनाचे कारण देत पुढे ढकललेली परीक्षा ज्यावेळी आहे, त्यावेळी एकट्या जालन्याचा विचार केल्यास, जालना हेच मोठे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी प्रशासनाकडून कोरोना संबंधित सर्व ती काळजी काटेकोरपणे घेतली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास हँडग्लोव्ज आणि सॅनिटायझर देण्यात येणार आहे, तसेच कोरोनाची लागण असलेल्यांना स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांना पीपीई किट देण्यात येणार आहेत.
एक तास आधी यावे लागणार
रविवारी ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. पहिला पेपर हा सकाळी दहा ते १२, तर दुसरा पेपर हा तीन ते पाच या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्रात सोडण्याआधी विद्यार्थ्यांची तापमानाची नोंद घेऊन त्यांना साहित्य देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेस येताना, परीक्षा केंद्रावर एक तास आधी येण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.