मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेची सोमवारी मंठा तहसील कार्यालयात मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र, यानंतर काही गावांमध्ये किरकोळ वादावादी, मारामाऱ्या झाल्याच्या घटना घडल्या; पण तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याची माहिती देण्यात आली.
खोराड सावंगी, सोनुनकरवाडी आणि दुधा- सासखेडा येथील प्रत्येकी एका जागेसाठी सारखेच मतदान झाले. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून निर्णय देण्यात आला. अंभोरा जहागीर येथील वॉर्ड नंबर एकच्या बूथवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदानाच्या दिवशी झालेले ३६३ मतदान आज मतमोजणीच्या वेळी ३५७ भरत असल्यामुळे अंभोरा जहागीर येथील उमेदवार आणि एजंटनी आक्षेप घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी मध्यस्थी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तेथील ग्रामस्थांना मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लेखी दिले. निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींवर विविध पक्षांचे नेते आपापला दावा करीत आहेत. यात भाजपच्या ताब्यात २८ ग्रामपंचायती आल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले, तर काँग्रेसचा १७ ठिकाणी विजय झाल्याचे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले. शिवसेनेच्या १३ ग्रामपंचायती असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
कोट
अंभोरा जहागीर येथील वॉर्ड नंबर १ मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे मतदानाच्या दिवशी ३६३ मतदान झाले होते; परंतु मत मोजणीच्या दिवशी ३५७ मतदान निघाल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. त्यांना मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लेखी दिले आहे.
चंद्रकांत सेवक, निवडणूक निर्णय अधिकारी, अंभोरा जहागीर.