विकास व्होरकटे
जालना : लालपरीची तासनतास बस स्थानकांमध्ये प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांना यापुढे बसची वाट पाहावी लागणार नाही. यासाठी जिल्ह्यातील २५० बसेसवर ‘जीपीएस यंत्रणा’ बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा २० जानेवारीपासून कार्यान्वित करण्याचा महामंडळाचा मानस असून, त्या दृष्टीने एसटी महामंडळाचे कामकाज सुरू आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेव्हूळ यांनी दिली.
आजही ‘बसचा प्रवास सुरक्षित प्रवास’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बसेसद्वारे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही, परंतु अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे बस नियोजित वेळेत आगारात येत नाही. त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हिच बाब हेरून महामंडळाच्या वतीने बसेसवर जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या निर्णय मध्यंतरी घेण्यात आला होता. यानुसार, जिल्ह्यातील २५० बसेसवर आजवर ‘जीपीएस’ बसविण्यात आले आहे, परंतु यातील दूरच्या पुणे, मुंबई सारख्या ७० मार्गांवरच ही यंत्रणा सद्यस्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे. २० जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील गाव-खेड्यांमधील रस्त्यांसह सर्वच मार्गांवर जीपीएस यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांनी महामंडळाचे असलेले अॅप्स मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे. अॅप्सच्या माध्यमातून प्रवाशांना कोणती बस कुठे व कुठपर्यंत आली, शिवाय बस स्थानकात किती बस येतात व जातात. याची माहिती मिळणार आहे.
चौकट
जालना आगार प्रमुख पंडित चव्हाण म्हणाले, मागील दोन महिन्यांपासून आगारातील ७७ बसेसला ‘जीपीएस यंत्रणा’ बसविण्याचे काम सुरू होते. सध्या सर्वच बसेसवर ‘जीपीएस’ बसविण्यात आले आहे. हे सुरू झाल्यास प्रवाशांची वेळीची मोठी बचत होईल, त्यांना घर बसल्या कोणती बस कुठे आली, आगारात येण्यास किती वेळ लागेल, याची सर्व इत्यंभूत माहिती मिळेल, शिवाय कुठे बसचे ब्रेक डाऊन व अपघात झाल्यास आमच्या कर्मचाऱ्यांनाही वेळेवर व घटनास्थळी पोहोचण्यासाठी ‘जीपीएस यंत्रणेचा’ मोठा फायदा होणार असल्याची माहितीही आगार प्रमुख चव्हाण यांनी दिली.