बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) मुलांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. चालू शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लॉटरी पद्धतीने मुलांची निवड करण्यात आली होती. परंतु, १९१८ पैकी आजवर केवळ ४५२ मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. इतर पालकांनी मुलांच्या प्रवेश प्रक्रियेकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष केले आहे. ही प्रवेश प्रक्रिया व्हावी, यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
दुसऱ्यांदा मुदतवाढ
आरटीई अंतर्गत लकी ड्रॉ पद्धतीने मुलांच्या प्रवेशासाठी निवडी करण्यात आल्या आहेत. परंतु, जिल्ह्यातील पालकांनी प्रवेश प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा २३ जुलैपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ दिली आहे.
कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्ष पूर्णत: वाया गेले आहे. त्यात चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्या असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. कोरोनाची संभाव्य लाटही येण्याची शक्यता आहे. अशा एक ना अनेक कारणांनी प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम होताना दिसत आहे.
शाळांचे पैसे सरकार कधी देणार?
आरटीई अंतर्गत यापूर्वीच झालेल्या प्रवेशाची प्रतिपूर्ती रक्कम थकीत आहे. यंदा मुलांना प्रवेश देत आहोत. परंतु, शासन आरटीई अंतर्गत प्रतिपूर्तीची रक्कम कधी देणार, हाच प्रश्न आहे.
- गजानन वाळके, संस्थाध्यक्ष
पालकांच्या अडचणी काय?
आरटीईअंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेतला जातो. परंतु, अनेक शाळा विविध प्रकारची फी मागतात. त्यामुळे अनेक पालक पैशाअभावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत नाहीत.
- कृष्णा फुटाणे, पालक
गरजू मुलांना शाळेत मोफत प्रवेश मिळतो. परंतु, प्रवेशानंतर अनेक शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या फी मागत असल्याने प्रवेशाकडे अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत.
- ज्ञानेश्वर छल्लारे, पालक
प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ
आरटीईअंतर्गत प्रवेश व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लॉटरीत नावे निघालेल्या मुलांचे पालकांनी प्रवेश निश्चित करावेत.
- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी